भीमाशंकर व गुप्तभीमाशंकर

भीमाशंकरचा इतिहास व इतर माहिती.
History of Bhimashankar and other information.
श्री क्षेत्र भीमाशंकर भारतातील अध्यात्मिक क्षेत्रातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व खेड (राजगुरूनगर) या दोन तालुक्यांच्या सीमेवर आहे. भीमाशंकर गाव आंबेगाव तालुक्यात व भीमा शंकराचे देवालय खेड तालुक्यात अशी भौगोलिक विभागणी आहे. तसेच भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या ज्योतिर्लिंगांमधूनच पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते. भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. १९८४ साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली.
पुण्यातून भीमाशंकर ला जाण्यासाठी दोन मार्ग आहे. पहिला जो मार्ग आहे तो खेड तसेच राजगुरुनगर आणि दुसरा म्हणजे मंचर वरून भीमाशंकर ला जाता येते. आणि जाणारा रस्ता अतिशय सुंदर बनवला गेला आहे. त्याचबरोबर भक्तांना कोणताही त्रास न होण्यासाठी वाहने लावण्यासाठी व्यवस्थित सोय करण्यात आलेली आहे.
भीमाशंकरच्या जंगलामध्ये रानडुक्कर, सांबर, भेकर, माकडे, वान्न्यार, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या, साप, अजगर असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात. येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू म्हणजे उडणारी खार. येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलातच आढळते. बिबट्याच्या संवर्धनासाठी येथे वनविभागाने विविध योजना केल्या आहे.
भीमाशंकर गाव मंदिर परिसरात असलेल्या जंगलास म्हणजेच (वनाला) ‘डाकिनी’ देवीचे वन म्हणतात. आजही भीमाशंकरच्या परिसरास ‘डाकिन्या’ भीमाशंकरम्’ असा शब्दप्रयोग करतात. वास्तविक डाकर्ण नावाच्या बौद्ध तंत्रग्रंथांमध्ये डाकिनी स्वामीने वाराही देवीस वर दिला, असा उल्लेख सापडतो. या ग्रंथामध्ये ३७ योगिनींचा उल्लेख आहे. साधारण या ग्रंथाचा निर्मिती काळा तेराव्या शतकाच्या आसपास मानला जातो. डाकिणी ही तांत्रिक देवता असून हिंदू व बौद्ध दोन्ही धर्मामध्ये तिला मान आहे.
श्री भीमाशंकर विषयी पहिली कथा :-
त्रिपुरासुर नावाचा एक दैत्य होता. त्याची तीन रूपे होती. ती तीन गगनसंचारी म्हणजेच अवकाशामध्ये होती. तो अवकाशामधून मनाला वाटेल तसे देव आणि मानवावर अग्निवर्षाव करत असे. त्रिपुरासुराच्या या त्रासामुळे सर्वच देव हदबल झाले होते. हे सर्वजण भगवान शंकरास शरण गेले. भगवान शंकराने त्या असुराच्या सहारासाठी सिद्ध होऊन त्यांनी डोंगराचा रथ तयार केला. मात्र त्रिपुरासुर काही दात देईना, अखेरीस भगवान शंकराने पाशुपत मंत्राने बाण मंत्रीत करून तो त्रिपुरा सुरावर सोडला आणि तिन्ही पुराणसह त्यास ठार करून टाकले. या कामाध्ये भगवान शंकरास फार परिश्रम घ्यावे लागले. त्यांच्या शरीरातून घामाच्या धारा निघू लागल्या. त्यावेळी त्याच परिसरात तपश्चर्या करणारा भिमक नावाचा राजा भगवान शंकराच्या दर्शनासाठी आला.
भगवान शंकराने त्यास वर माग असे सांगितले. भीमकाने वर मागितला. प्रभू या धर्मादारांची पुण्य पावन नदी होऊन दे. भिमक राजामुळे ही नदी उत्पन्न झाली असल्यामुळे तिला भीमा किंवा भीमरती असे नाव मिळाले. इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी “पुराणकथा” आणि “वास्तवता” या ग्रंथामध्ये असे स्पष्ट नमूद केले आहे, की पुराणकथेतील वास्तविकता शोधण्यासाठी ती समजून घेणे आवश्यक आहे. ती कथा एकदम उगम पावत नाही अर्थात त्याविषयी काहीतरी तथ्य असणार म्हणून असे घडते.
श्री भीमाशंकर विषयी दुसरी कथा :-
अशीच दुसरी कथा भीमाशंकर या नावाशी सांगितली जाते. एकदा एका लाकूडतोड्याची कुऱ्हाडीचा घाव एका झाडाच्या मुळात बसला आणि त्याबरोबर तिथून रक्त वाहू लागले. मग त्याने एक दुभती गाय तेथे आणून उभी केली. आणि रक्ताच्या ठिकाणी गायीच्या दुधाच्या धारा सोडल्या त्यामुळे लगेच रक्त थांबले. तिथून एक शिवलिंग वर आले आणि तेच पुढे भीमाशंकर या नावाने प्रसिद्ध झाले. ही कथा आजही भीमाशंकर परिसरात सांगितली जाते. कथेमधील सत्य समोर आणण्यासाठी जास्त काम अथवा संशोधन करावं लागणार आहे.
भीमाशंकर परिसराच्या प्राचीन इतिहास समजून घेण्यासाठी महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास माहिती करून घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाचा प्रारंभ हा साधारण सातवाहन काळापासून मानला जातो. प्राचीन कालखंडातील बलाढ्य साम्राज्य म्हणून दक्षिणेतील सातवाहन राज्य मानले जाते. महाराष्ट्रावर त्यांची सत्ता सुरुवातीपासून अखेरपर्यंत होती. ते महाराष्ट्राचे भाग्यविधाते मानले जातात. सातवाहन साम्राज्य म्हणजे महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासाचे सुवर्णयुग मानतात. या प्रदेशाला महाराष्ट्र हे नाव सातवाहनामुळे प्राप्त झाले. अशोकाच्या कोरीव लेखांमध्ये या ठिकाणाचा उल्लेख आहे. राष्ट्रीक हा संस्कृत शब्द आहे. त्यावरून रठिक अशी उपपत्ती लावता येते. त्याच काळामध्ये या लहान वसाहतींचे एकत्रीकरण करून महाराष्ट्र तयार झाला. वात्सायनाच्या कामसूत्र या ग्रंथात “महाराष्ट्र कानाम” म्हणजे महाराष्ट्रातील लोक असा उल्लेख आहे. वराहमिहिरांची बृहत्संहिता ग्रंथात व ऐहोळे शिलालेखात (इ.स. ६३४) त्रीमहाराष्ट्र असा उल्लेख आहे.
रामायण व महाभारत या ग्रंथामध्ये भीमाशंकर परिसरातील म्हणजेच आंबेगाव तालुक्यातील काही गावांच्या नोंदी विषयी कथा आहेत. आणि आज सुद्धा ह्या कथा सांगितल्या जातात. उदाहरणार्थ रामायणामध्ये आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून प्रभू रामचंद्र वनवासासाठी दंडकारण्यामध्ये जातात. दंडकारण्य म्हणजे नेमका कोणता भूप्रदेश, तर त्यात प्रामुख्याने त्रंबकेश्वर पासून नाशिक ते कोल्हापूरचा भाग, पश्चिम किनारपट्टीचा समावेश असलेला भूभाग एवढ्या प्रदेशाचा समावेश होता असे सांगण्यात येते.
सीता मातेच्या शोधात निघालेले हनुमान भीमाशंकर ला काही काळ थांबले होते अशा कथा भीमाशंकर च्या इतिहासात आजही प्रसिद्ध आहे. या कथे प्रमाणे श्री हनुमानाने भीमाशंकर परिसरात वास्तव्य केले आहे हे समजते. तेथील एका तळ्यास हनुमान तळे असे नाव आजही आहे. राष्ट्रकूट कालखंडात पुणे जिल्ह्याच्या परिसरातील विविध गावांच्या नोंदी सापडतात. राष्ट्रकूट कालीन प्रशासनामध्ये “पुनक” हा विभाग होता “पुनक” म्हणजे आजचा पुणे जिल्हा होय.
गुप्तभीमाशंकरचा इतिहास :-
अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे. भीमा नदीचा मूळ उगम ज्योतिर्लिंगात आहे परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे दीड किलोमीटर पूर्वेला पुन्हा उगम होतो. असे मानले जाते. ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते.
मुख्य मंदिरापासून गुप्त भीमा शंकराकडे जाताना एक पाण्याचे कुंड दिसते. दोन्ही बाजूंनी गर्द झाडी शांत रस्ता एक रोमांचक प्रवास अनुभवता येतो. पावसाळ्यामध्ये गुप्त भीमाशंकर कडे जाणारा हा रस्ता अतिशय धोकादायक होतो. परंतु इतर दिवसांमध्ये काहीही अडचण येत नाही. रस्ता न चुकण्यासाठी काही दगडावरती तसेच झाडांवरती काही सूची लिहिलेल्या आहे की जेणेकरून गुप्त भीमाशंकराकडे व्यवस्थित तुम्हाला जाता यावे.
जाता जाता एक रस्त्याच्या कडेला छोटसं गणपतीचे मंदिर दिसतं. त्या मंदिराच्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणात माकडे दिसतात. भीमा नदीचा उगम याच गुप्त भीमा शंकर या ठिकाणापासून सुरू होतो असं मानले जाते. आणि हे पाणी बारा महिने वाहत असतं. मुख्य ठिकाणी आल्यानंतर धबधब्याच्या शेजारीच एक छोटीशी पिंड आहे. यालाच गुप्त भीमाशंकर असे म्हणतात.