मांढरदेवी काळूबाई

 

मांढरदेवी काळूबाई, सातारा

 

  • Information about Sri Mandhardevi Kalubai in ​​Marathi.

  • श्री मांढरदेवी काळूबाई देवीची मराठीत माहिती.

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यातील मांढरदेव येथील श्री काळेश्वरी उर्फ काळुबाई या देवीचे मंदिर आहे. वार्षिक यात्रा पौष महिन्याच्या पौर्णिमेला असते. तिला शाकंभरी पौर्णिमा किंवा चुडी पौर्णिमा असेही म्हणतात. श्री काळेश्वरी देवी आदिमाया पार्वतीचे रूप आहे. ही देवी नवसाला पावणारी असल्याने नवस पूर्ण  करणारे भाविक वर्षभर येत असतात.

समुद्रसपाटीपासून ५,००० फूट उंचीवर असलेल्या गर्द करवंदीच्या वनराईत विराजमान झालेल्या काळुबाईचे स्थान भौगोलिक दृष्ट्या शंभू महादेवाच्या डोंगर रांगेत पुणे व सातारा या दोन जिल्ह्यांच्या तसेच वाई-भोर खंडाळा या तीन तालुक्यांच्या हद्दीवर आहे. तसेच मांढरदेवी काळुबाई हे देवस्थान सह्याद्री पर्वतरांगेतील एका डोंगरावर आहे. तसेच तेथे पोहोचण्यासाठी पुण्याहून भोर मार्गे तसेच साताऱ्याहून वाई मार्गे घाट लागतो.

आजूबाजूचा परिसर  अतिशय निसर्गरम्य आहे. तसेच मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी पुणे जिल्ह्यातील भोर मार्गे मोठा घाट लागतो. तसेच साताऱ्यातुन  सुद्धा येताना वाई मार्गे घाट लागतो.

मांढरदेवीचा इतिहास:-

मांढरदेवीचे मंदिर मंदार पर्वतावर आहे. तेथे मांढव्य ऋषींचे वास्तव्य होते. त्यामुळे “मांढव्य” या शब्दाचा अपभ्रंश होऊन “मांढर” शब्द झाला असावा असे मानले जाते. पूर्वजांकडून असं सांगण्यात येतं की, पुरातन काळात दक्षिण भारतात दानवांनी त्रास देण्यास सुरुवात केली होती. तेव्हा आधी माया पार्वतीने महाकालीच्या रूपात त्यांचा विनाश केला व मंदार पर्वतावर ती विश्रांतीसाठी आली आणि येथेच स्थानापन्न झाली. असे सांगण्यात येते.

देवीचे मंदिर कधी व कोणी बांधले याची नोंद नाही. पण मंदिराच्या हेमाडपंथी शैलीतील बांधकामामुळे हे मंदिर बरेच प्राचीन असल्याचे समजून येते. मांढरदेवीच्या डोंगरावरील काळुबाईच्या मंदिरापेक्षा महादेवाचे हेमाडपंती मंदिर अधिक प्राचीन असावे असे मानले जाते. हे मंदिर हेमाडपंती शैलीतील असल्याने मध्ययुगातील उत्तरार्धात देवगिरीच्या यादव सम्राट सिंघण यांच्या  कारकिर्दीत इ. स. १२१० ते १२४७ च्या दरम्यान ते बांधले असावे असा अंदाज लावला जातो. सह्याद्री पर्वत रांगेतील एका उंच समुद्रसपाटीपासून ४,६५० फूट टेकडीवर हे मंदिर आहे.

कोल्हापूर या भागावर पन्हाळा येथील शिलाहार या सम्राट चालुक्याच्या सामंतांच्या घराण्यातील अखेरचा राजा दुसरा भोज याची सत्ता होती. या राजाने मांढरदेवी शेजारचा पांडवगड हा किल्ला बांधला.  तसेच वाई परिसरातील केळंजाळगड, वैराटगड, चंदनवंदन हे किल्ले ही बांधले. इ. स. १२०९ मध्ये सम्राट सिंघन ने या राजाचा पराभव करून या भागावर यादवांची सत्ता प्रस्थापित केली. व आपले साम्राज्य मोठया प्रमाणात पसरवले.  राजकीय व सांस्कृतिक एकात्मतेसाठी यादव राजांनी गावोगावी हेमाडपंथी पद्धतीची मंदिरे उभारली. आणि ही मंदिरे इतर मंदिरांपेक्षा वेगळी होती.  यादवांकडे असलेल्या  हेमांद्रीपंत याने विकसित केलेली हेमाडपंती ही शिल्पशैली होय. विशिष्ट आकारचे दगड एकमेकांवर शास्त्रीय पद्धतीने बसवून मंदिरे उभारली जात. या बांधकामात चुन्याचा अगर लोखंडाचा वापर केला जात नाही. हे त्या काळचे वैशिष्ट्य होते.

हेमाडपंती मंदिराला ऊन, वारा, पाऊस, धुके यामुळे या बांधकामातील एखादा दगड जर घसरून  किंवा झिजून पडला तर सर्व तोल बिघडून मंदिर भुई सपाट होऊ शकते. कारण या बांधकामात दोन दगडांच्या मध्ये चुन्याचा वापर केला जात नाही. त्यामुळे बांधकाम एकजीव होत नाही. अशी माहिती पुरातत्व खातं देतं. त्यामुळे काळुबाईच्या मंदिरा शेजारील महादेवाचे मंदिर देखील पडलेले असावे. कारण ते हेमाडपंती काळातील होते. यामुळे काळुबाईचे मुख्य मंदिर हे हेमाडपंती नसून हे आताच्या काळातील बांधकाम दिसते.

काळूबाई मंदिराची माहिती:-

काळुबाई मंदिर हे महादेवाच्या मंदिरानंतर काही वर्षांनी बांधले गेले असावे. शिवकाळात म्हणजे इसवीसन सतराव्या शतकाच्या मध्याला जी हेमाडपंती मंदिरे बांधली गेली त्याच शैलीतील हे मंदिर आहे. पूर्वी हे मंदिर केवळ १० फूट लांब व ५ फूट रुंदीचा एक खण होता. सध्याच्या गाभाऱ्यातील मधला खन म्हणजे हे मूळ मंदिर होय. या दगडी मंदिराला पूर्वी शिखर नव्हते.

दीपमाळेची माहिती :-

याच काळात मंदिरासमोर दीपमाळा उभारण्याची पद्धत रूढ झाली असावी. याही मंदिरासमोर १५ फूट उंचीच्या दोन दीपमाळा आहेत. यावरून हे मंदिर इसवीसन १६५० ते १६७० च्या दरम्यान बांधले असावे असे वाटते. महाराष्ट्रातील भगवान शंकराच्या आणि खंडोबाच्या अनेक मंदिरासमोर दीपमाळा असलेल्या असतात. काळुबाई देवी ही शंकराची पत्नी तसेच स्कंद माता म्हणजे खंडोबाची आई असल्याने तिच्याही मंदिरासमोर त्या काळात दीपमाळा उभारल्या असाव्यात असे सांगितले जाते.

मंदिराचा गाभारा व शिखराची माहिती:-

काळुबाईच्या मूळ मंदिराच्या दक्षिण उत्तर बाजूला प्रत्येकी एक याप्रमाणे दोन खणाचे बांधकाम इसवीसन १७५० च्या दरम्यान झाले असावे. मूळचा एक खण व नंतरचे दोन खण असे मिळून तीन कण म्हणजे मंदिराचा गाभारा होय. हा गाभारात १५ फूट लांब व १० फूट रुंद आहे. या गाभाऱ्यातील शिखराचे बांधकाम इसवी सन १७५० साली करण्यात आले. हे काम करीत असताना तेली बाबा या कारागिऱ्याचा शिखरावरून पडून मृत्यू झाला त्याची समाधी मंदिरा जवळच बांधली आहे. आणि ती आता सुद्धा दिसून येते.

मंदिराच्या पायरीवरील लेख:-

मंदिराच्या पायरीवर एक फलक लावलेला असून, त्यावरून असे समजते की ४ फेब्रुवारी १८६२ च्या नोंदीवरून देवीचे मूळ नाव “काळेश्वरी” असे आहे. या देवस्थानला ५० एकर जमीन आहे. त्याची देखभालकरण्याची जबाबदारी रावजी बीन सजनाजी गुरव यांच्याकडे होती. शेतीच्या उत्पन्नातून जे मिळायचे त्यातून देवीची पूजा-अर्चा करीत असे. आज त्यांच्या वंशजांना परंपरेने देवीची पूजा-अर्चा करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे.

सभागृहाच्या बांधकामाची माहिती:-

गाभाऱ्यालगचे मंदिराचे दगडी सभागृह इसवी सन १९३५ साली बांधण्यात आले. या सभागृहावर टी आकाराच्या पद्धतीने छत बांधण्यात आले. हे सभागृह २० फूट लांब व १५ फूट रुंद आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मते काळुबाईचे मंदिर हे शिवकाळाच्या पूर्वीही होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कागदपत्रांमध्ये मांढरदेवीच्या काळुबाई मंदिराचा उल्लेख आढळतो.

मंदिराच्या आजूबाजूचा परिसराची माहिती:-

तसेच मुख्य मंदिरासमोरील डोंगरात काही अंतरावर म्हसोबा देवाचे ठाण आहे. काळुबाई मंदिर परिसर निसर्गरम्य असून गर्द झाडीने नटलेला आहे. आणि मुख्य मंदिराच्या पायऱ्या चढताना अगोदर दोन्ही बाजूने देवीच्या पूजेचे साहित्य तसेच हार, वेणी, प्रसाद, देवीची प्रतिमा, विविध खाण्याचे पदार्थ यांची दुकाने आहे.

मंदिराच्या पायऱ्या चढताना उजव्या बाजूला अतिशय सुंदर गार्डन तयार करण्यात आलेल आहे. आणि पायऱ्यांच्या मधोमध लाईटचे बल सुद्धा बसवण्यात आले आहे. आणि शेजारीच श्री हनुमानाचे मंदिर सुद्धा आहे. मांढरदेवी काळुबाईची यात्रा जानेवारी महिन्याच्या आसपास येते व महाराष्ट्राहून तसेच बाहेरून राज्यातील मोठ्या प्रमाणात भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात.

मूर्तीचे स्वरूप :-

मांढरदेवी येथे देवीचे स्वयंभू  स्थान (मूर्ती) असून मूर्ती चतुर्भुज आहे. देवीच्या उजव्या हातात त्रिशूल आणि तलवार आहे. तर डाव्या हातात ढाल आणि दैत्याची मान पकडलेली आहे. देवी उभी असून एक पाय दैताच्या छातीवर ठेवलेला आहे. संपूर्ण मूर्तीला शेंदूर लावलेला आहे. देवीला बारामाही साडी नेसवलेली असते व इतरवेळी देवीच्या चेहऱ्यावर चांदीचा तर यात्रोत्सवात सोन्याचा मुखवटा बसविला जातो. आणि देवीचे वाहन सिंह आहे.

देवीवरची श्रद्धा:-

ज्या गावांमध्ये देवीचे मंदिर आहे. तसेच कुटुंबामध्ये देवीची स्थापना केलेली असेल तर देवीच्या यात्रेच्या वेळेस देवीची मूर्ती तसेच मुखवटा घेऊन गाभाऱ्यामध्ये किंवा मंदिराकडे जाताना ढोल ताशाच्या गजरामध्ये देवीला नेण्यात येते. देवीला नैवेद्य देण्यासाठी प्राण्यांची बळी देण्यात येते परंतु काही वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेमुळे प्राण्यांचे बळी देण्यासाठी प्रशासनाने बंदी करण्यात आली आहे. किंवा मंदिराच्या दूर ठिकाणी बळी देण्यात येते. देवीच्या भक्तांच्या अंगामध्ये काळुबाई देवीचे तसेच म्हसोबा देवाचे वारं येत. ज्या गावांमध्ये काळुबाई देवीचे मंदिर आहे त्या गावांमध्ये वार्षिक यात्रेला पाच ते सात दिवस देवीची पूजा केली जाते. तसेच ढोल ताशांच्या गजरामध्ये यात्रा उत्साहात साजरी केली जाते.

श्री मांढरदेवी विषयी आख्यायिका सांगितली जाते.

पांडवा विषयी मतभेद सांगितले जाते:-
मांढरदेवी येथील काळुबाई मंदिर नेमके केव्हा बांधले गेले याचा इतिहास उपलब्ध नाही. व कोणतेही दस्तावेज उपलब्ध नाही. तसेच काहींच्या मते हे पांडवकालीन मंदिर असावे तथापि याला इतिहास संशोधकांची मान्यता दिलेली नाही. कारण पांडव या भागात आलेलेच नव्हते वाई ही महाभारत काळातच विराट नगरी होती व पांडव अज्ञातवासात येथे पांडवगडावर राहिले होते. असे सांगितले जाते. या समजूतीला इतिहास तज्ञांना कोणताही पुरावा सापडलेला नाही. वाई परिसरातील अनेक स्थळांना नावे दिलेली आहेत. उदा. पांडवगड, वैराटगड, भीमकुंड, किचक टेकडी इत्यादी नावे पांडवांच्या नावावरून किंवा समान घटकांवरून दिली आहेत. असे तज्ञांचे मत आहे.

 

देवीचे भक्त पाटील यान्ना पडलेले स्वप्न:-
काळुबाई मंदिराच्या उत्पत्ती विषयी काही आख्यायिका सांगितल्या जातात. प्राचीन काळी मांढरदेव गावाच्या पाटील घराण्यातील एका भाविकाला देवीने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला. त्याप्रमाणे तो भाविक गावकऱ्यांना घेऊन डोंगर माथ्यावर गेला तेथील जमीन खोदली असता त्याला जमिनीत पुरलेली देवीची मूर्ती आढळली. तिथेच तिची प्राणप्रतिष्ठा करून मंदिर बांधले गेले अशी आख्यायिका सांगतात.

 

मांढव्य ऋषींची कथा:-
मांढरदेवीच्या डोंगरावरील महादेवाच्या मंदिरात प्राचीन काळी मांढव्य ऋषी तपस्या करीत होते. ते शिवभक्त होते. परंतु त्यांना त्यांच्या या तपस्येत एक दैत्य त्रास देत होता. या त्रासापासून मुक्तता व्हावी अशी त्या ऋषींनी भगवान शंकराकडे प्रार्थना केली. तेव्हा भगवान शंकराने देवी महाकालीच्या द्वारे त्या दैत्याचा विनाश केला. म्हणून महाकालीच्या कृपेने त्रास दूर झाल्यामुळे डोंगराच्या शिखरावर तिचे मंदिर बांधले गेले. मांढव्य ऋषीवरून त्या देवीला मांढरदेवी आणि त्या गावाला मांढरदेव असे नाव दिले गेले अशी दुसरी आख्यायिका सांगितली जाते.
या दोन्ही आख्यायिके वरून असे समजते की, आज पर्यंत काळुबाई देवीचे मंदिर किती प्राचीन आहे तसेच नक्की इतिहास काय आहे ते अजून समजलं नाही. मांढरदेवी गावामध्ये अजून सुद्धा गावकऱ्यांमध्ये दोन्ही आख्यायिकेवरून मतभेद सांगितले जाते. हे नक्की आहे की, मांढर डोंगराचे महत्त्व प्राचीन काळापासून असल्यामुळे तो एक ऐतिहासिक डोंगर मानला जातो.